NCP Candidate List : जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची राष्ट्रवादीकडून घोषणा!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेथेही निवडणुकीच्या मैदानात उतरला असून राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संसदीय मंडळाने पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसूफ हजम, पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून 'घड्याळ' या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे इतर कुठल्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवत आहे असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यानुसार १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण २४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल असेही ब्रीजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.