नागपूरमध्ये चाललंय काय?; मृत शिक्षणाधिकाऱ्याच्या खोट्या सह्या; शासनाची कोट्यवधींची फसवणूक

नागपूरमध्ये चाललंय काय?; मृत शिक्षणाधिकाऱ्याच्या खोट्या सह्या; शासनाची कोट्यवधींची फसवणूक

महाराष्ट्र शिक्षक परिषद यासंदर्भात नागपूरच्या 580 बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करणार आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

नागपूरमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून तब्बल 100 हून अधिक शिक्षकांची भरती धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषद यासंदर्भात नागपूरच्या 580 बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करणार आहेत. निवृत्त शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सहीचा गैरवापर करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तसेच माजी शिक्षक आमदार गाणार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले सोमेश्वर नैताम यांना 2016 साली त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकून मोठ्या रकमेसहीत अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बोगस सह्या असलेला आदेश बोगस शिक्षक नियुक्तीत वापरण्यात आला. हा आदेश 2024 पर्यंत काढण्यात आला. सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतर पैसे घेऊन बोगस शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. बनावट शालार्थ ओळखपत्राद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करुन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बोगस शिक्षकांच्या बॅंक खात्यावर पगार जमा झाल्याच्या नोंदींचीही तपासणी होणार आहे. तसेच, या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com