एफबीआयच्या संचालकपदावर मूळ भारतीय वंशाच्या वकिलाची नियुक्ती
वॉशिंग्टन डीसी - मूळ भारतीय वंशाच्या नागरिकानं पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनात मोठ्या पदावर स्थान मिळविलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) कश्यप उर्फ काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) पुढील संचालक म्हणून घोषणा केली आहे.
काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी संरक्षण आणि गुप्तचर विभागातील विविध वरिष्ठ पदांवर भूमिका बजाविली. काश पटेल यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमकपणं प्रचार केला.
कोण आहेत कश्यप पटेल- काश तथा कश्यप पटेल हे व्यवसायाने वकील आहेत. ते मूळचे गुजराती आहेत. त्यांचा जन्म 1980 मध्ये गार्डन सिटी, न्यूयॉर्क येथे झाला. रिपोर्टनुसार पटेलचे आई-वडील पूर्व आफ्रिकेत वाढले. इदी अमीन हे दक्षिण आफ्रिकेत हुकूमशहा असताना त्यांचे वडील प्रमोद यांनी 1970 मध्ये युगांडा सोडून अमेरिकेत आले. कश्यप पटेल यांनी रिचमंड विद्यापीठात (व्हर्जिनिया) पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. यानंतर न्यूयॉर्कमध्ये कायद्याची पदवी घेतली. यूकेमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमाणपत्र देखील त्यांनी मिळविले. न्यूयॉर्कमधील काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांसाठी त्यांनी वकिलीचे काम केले.