Diwali Bonus : दिवाळीचे गिफ्ट्स टॅक्स-फ्री? मग बोनसचं काय ?
थोडक्यात
दिवाळीत कंपनीकडून मिळाला बोनस, मग टॅक्स लागणार का?
दिवाळीचे गिफ्ट्स टॅक्स-फ्री?
रोखीतील बोनसवर लागेल कर
‘दिवाळीनिमित्त अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस, गिफ्ट आणि मिठाई वाटपाचा धडाका लावला आहे. काही कंपन्या मिठाई, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू वा गिफ्ट व्हाऊचर पण देत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. पण दिवाळीला दिलेला बोनस अथवा कंपन्यांनी दिलेले गिफ्ट हे कराच्या परिघात येते का? अनेकांना वाटते की सणासुदीत देण्यात आलेले गिफ्ट टॅक्स फ्री असते. पण काही वेळा त्यावर कर लागतो. दिवाळी गिफ्ट्सविषयी जे नियम आहेत, त्याबाबत ITR फायलिंग करताना कोणतीही माहिती लपवू नका.
दिवाळीचे गिफ्ट्स टॅक्स-फ्री?
काही वृत्तानुसार, दिवाळीतील सर्वच गिफ्ट्स टॅक्स फ्री नसतात. छोट्या भेट वस्तू जशा की मिठाईचा बॉक्स, कपडे वा 5,000 रुपयांपर्यंतच्या इलेक्टॉनिक वस्तू कर मुक्त असतात. पण 5,000 रुपयांपेक्षा महागडी गिफ्ट्स यामध्ये ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, व्हाऊचर्स यावर मात्र कर लागतो. या गिफ्ट्सचे एकूण मूल्य हे कर्मचाऱ्याच्या वार्षिक उत्पनात जोडल्या जाते. त्यावर वेतनाप्रमाणे कर लावण्यात येतो.
कर सल्लागारानुसार, 5,000 रुपयांपेक्षा अधिक दिवाळी बोनस कराच्या परिघात येते. त्यामुळे हे बोनस उत्पन्नासोबत जोडावे लागेल. 5,000 रुपयांपेक्षा अधिक दिवाळी बोनस मिळाले तर त्याची माहिती आयटीआर भरताना न दिल्यास त्याचा फटका बसेल. आयकर खात्याकडून याविषयीची विचारणा होऊ शकते. नोटीसही मिळू शकते.
रोखीतील बोनसवर लागेल कर
तज्ज्ञांच्या मते जर कंपनी दिवाळी सणाच्या निमित्ताने तुम्हाला रोखीत बोनस देण्यात आले असेल तर त्यावरही कर लागेल. हे बोनस तुमच्या वेतनाचाच भाग मानण्यात येईल. समजा कंपनीने कर्मचाऱ्याला 30 हजार रुपेय बोनस दिला. तर हे बोनस कर्मचाऱ्याच्या उत्पन्नाचा भाग असेल. त्यावर तुमच्या स्लॅबप्रमाणे कर लागेल. दिवाळीनिमित्ताने रोखीतील बोनसवर करातून कोणतीही सवलत, सूट मिळणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दिवाळीचे बोनस, गिफ्ट मिळत असले तरी ते कराच्या परिघात येणार का, याची शहानिशा करा. तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.