Bmc election 2026 : राहुल नार्वेकर आणि हरीभाऊ राठोड यांच्यात वाद...नार्वेकर आणि राठोड यांच्यात निवडणूक कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप करत हरिभाऊ राठोड यांनी नामनिर्देशन अर्ज प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा दावा केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना जाणीवपूर्वक अडवण्यात आल्याचा, तसेच बिनविरोध निवड सुनिश्चित करण्यासाठी दबाव आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.
हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 होती आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास कार्यालयात आलेल्या उमेदवारांची प्राथमिक छाननी करण्यात आली, त्यांना टोकन देण्यात आले आणि डिपॉझिटची रक्कमही स्वीकारण्यात आली. अर्ज तपासणीसाठी आवश्यक असलेली चेकलिस्ट पूर्ण करूनही शेवटी 12 उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत.
दोन गेट, टोकन आणि छाननी; तरीही अर्ज नाकारले
राठोड यांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयात दोन प्रवेशद्वार होते, बूथ लावण्यात आले होते आणि अधिकारी तिथे बसले होते. उमेदवारांना टोकन देण्यात आले होते. छाननीची प्रक्रिया सुरू असताना अर्जदारांकडून डिपॉझिटही स्वीकारण्यात आले. एवढंच नव्हे तर संबंधित कागदपत्रे तपासून ‘प्रॉपर्टी’ (निवडणूक अर्जासोबत दिली जाणारी कागदपत्रे) उमेदवारांकडे सुपूर्द करण्यात आली. अर्ज स्वीकारण्याचं अंतिम कार्यालय केवळ दहा पावलांच्या अंतरावर असतानाही तेथे जाण्याची संधीच देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला.
‘मुख्यमंत्र्यांकडून कामं घेता आणि आमच्याविरोधात अर्ज भरता?’ नार्वेकरांचा सवाल हरिभाऊ राठोड यांनी दावा केला की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना थेट जाब विचारला की, “तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घेता आणि आमच्याविरोधात अर्ज भरता?” याच दरम्यान नार्वेकर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयात ये-जा करत होते, असा आरोपही त्यांनी केला. राठोड म्हणाले, “मला त्यांनी धमकी दिली. ‘तुम्हाला सिक्युरिटी कोणी दिली?’ असा सवाल केला. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही संवैधानिक पदावर आहात, अशा प्रकारचं वर्तन तुम्हाला शोभत नाही.”
बिनविरोध निवडीसाठी दबावाचा आरोप
आम्हाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोपही हरिभाऊ राठोड यांनी केला. “तुम्हाला बिनविरोध करायचं आहे, यासाठी आम्हाला धमक्या दिल्या जात होत्या. नार्वेकर हे संवैधानिक पदावर असूनही त्यांनी असा हस्तक्षेप केला,” असं राठोड म्हणाले.
गगराणी आणि प्रशासनावरही आरोप
या संपूर्ण प्रकरणाची माहिती आम्ही गगराणी साहेबांना दिल्याचं सांगत, त्यांनी “आम्ही रिपोर्ट मागवतो” असं उत्तर दिलं असल्याचं राठोड म्हणाले. मात्र, या प्रक्रियेत प्रशासन, पोलीस आणि संबंधित अधिकारीही दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. “लोकांना पोलिसांनी आत सोडलं नाही. आरओ यांनी पैसे स्वीकारले, पण अर्ज घेतले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री, गगराणी आणि पोलीस प्रशासन सगळेच जबाबदार आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
एबी फॉर्म उशिरा दिल्याचा आरोप फेटाळला
एबी फॉर्म उशिरा देण्यात आल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं. “एबी फॉर्म कोणीही उशिरा दिलेले नाहीत. आम्हाला ते 8-8 दिवस आधी मिळाले होते. सगळ्यांनी वेळेत फॉर्म दिले होते,” असं ते म्हणाले. आरओ निलंबन आणि कारवाईची मागणी या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत हरिभाऊ राठोड यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांना तात्काळ निलंबित करण्याची, तसेच गगराणी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणार’
हरिभाऊ राठोड यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “आमचे अर्ज मागे घेणार नाही. आम्ही निवडणूक लढवणारच. आमच्याकडे सरकारची अधिकृत रिसिप्ट आहे. अधिकाऱ्यांनी आमचे कागद तपासले, टोकन दिले. आता टोकन दिलेच नाहीत असं सांगितलं जात आहे.”
शेवटी त्यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, “नार्वेकर यांच्या भावाचा अर्ज जर बिनविरोध झाला, तर समजून जा की उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आलं.”
