सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू - छगन भुजबळ
मिनाक्षी म्हात्रे, मुंबई
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन केली. दरम्यान मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने या घटनेचा आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना केली आहे. मुंबई पोलिसांनी अनेक प्रकरणात काही तासात कारवाई केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात देखील लक्ष घालून कडक कारवाई केली पाहिजे जर कडक कारवाई झाली नाही तर यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रात करू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.