केजरीवालांच्या अडचणी वाढ! गृहखात्याने ईडीला दिली 'या' प्रकरणात खटला चालवण्याची परवानगी
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कथित मद्यधोरण संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खटला चालवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला परवानगी दिली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच मिळालेल्या या परवानगीमुळे ‘आप’च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते की, पीएमएलए अंतर्गत आरोपींवर खटला चालवण्यासाठी ईडीला सक्षम प्राधिकरणाकडून विशेष मंजुरीची आवश्यकता आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी गेल्या महिन्यात केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर आता गृहमंत्रालयाकडून देखील खटला चालवण्यास मंजूरी देण्यात आली आहे.