Raj Thackeray : निवडणूक जाहीर होताच, राज ठाकरे संतापले... म्हणाले

Raj Thackeray : निवडणूक जाहीर होताच, राज ठाकरे संतापले... म्हणाले

आज अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींचा समावेश आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा

  • मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

  • त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

आज अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहेत, तर तीन डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून सुरू आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ मिटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे.

आज देखील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली होती, त्यावेळी देखील विरोधकांनी आपली ही भूमिका कायम ठेवत, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर देखील निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर आपली पोस्ट शेअर केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

‘आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन’ असं या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com