Raj Thackeray : "लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले" शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंच मोठ वक्तव्य
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगडमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. दरम्यान राज ठाकरे म्हणाले की, "पूर्वी कोणताही आजार झाला की तो ताठ मानेने सांगितला जायचा, पण आजकाल त्यासारखीच अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे.
सध्याच्या राजकारणात नेते व्हायरल आजारासारखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात, ही स्थिती चिंताजनक आहे. मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग नाही आणता येणार. मराठी माणसाचा मान राखूनच राज्यात उद्योग आणले पाहिजेत. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्या जमिनी शेतच कुंपण खातोय अशा स्थितीत पोहोचल्या आहेत", अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
राजकारणातील बदलांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, "पूर्वी राजकारणी मोठ्या मनाचे होते, आज मोठं मन संकुचित होत चाललंय." यावेळी त्यांनी शिवसेना आणि डाव्या चळवळीतील ऐतिहासिक संबंधांची आठवण करून दिली. "पूर्वी शिवसेनेच्या व्यासपीठावर लाल ध्वज झळकला होता, आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज झळकत आहेत," असा उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री शालेय विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न का करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला. ते म्हणाले की, "बाहेरून येणाऱ्यांना मराठी शिकवण्यासाठी धोरणात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, "ते अभिमानाने सांगतात की आम्ही गुजराती आहोत. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला वळवले जात आहेत." रायगडमध्ये येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सर्व पक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. "शेतकऱ्यांनी आता त्यांच्या जमिनी उद्योगांसाठी देताना ‘पार्टनरशिप’च्या अटीवर करार करावा," असे आवाहन त्यांनी केलं.
अखेर, सरकारवर आरोप करताना ते म्हणाले, "अर्बन नक्षल कायद्याच्या आडून सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबत आहे. राज्याचा विकास प्लॅन केवळ मंत्र्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ते अगोदरच जमिनी खरेदी करून स्वतःचे खिसे भरत आहेत. पैसे फेकून मत विकत घेतले जात आहेत." राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, "बाहेरच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची प्रतिमा 'परसेचेबल लोकांचे राज्य' म्हणून उभी केली जात आहे, आणि ही बाब राज्याच्या भविष्यासाठी गंभीर आहे."
राज ठाकरे यांचे हे भाषण केवळ टीका करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्थानिकांचे हक्क आणि सामाजिक-आर्थिक न्याय यांचा बुलंद आवाज होता. मराठी माणसाचा सन्मान राखूनच उद्योग उभे राहिले पाहिजेत, ही त्यांची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे समोर आली. रायगडच्या भूमीतून त्यांनी राज्यातील राजकारण, शेतकऱ्यांची अवस्था आणि मराठी युवकांच्या भविष्यासंदर्भात जळजळीत प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना सजग होण्याचा इशारा दिला.