कांद्यावरून शेतकरी आक्रमक; अमरावतीत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
सुरज दहाट|अमरावती: राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न प्रचंड तापला आहे. कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे. सोबतच विरोधकांकडून देखील या कांदाप्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच या प्रश्नावरून आज अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. त्याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांकडून जोरदार निर्देशने करण्यात आले आहे. सोबतच त्यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेनिमित्त ते अमरावतीमध्ये आले होते. मात्र, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. सोबतच उपमुखमंत्री फडणवीस यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.