AWS च्या बिघाडामुळे जगभरातील अॅप्स आणि वेबसाइट्स सेवा ठप्प
अमेझॉनच्या क्लाऊड सेवांची शाखा Amazon Web Services (AWS) ने सोमवारी झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडानंतर अखेर समस्या सोडवण्यात यश मिळवले आहे. या बिघाडामुळे जगभरातील हजारो वेबसाइट्स आणि अॅप्स बंद पडले होते, ज्यामध्ये Fortnite, Snapchat, Duolingo तसेच काही मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवांचाही समावेश होता.
AWS ने आपल्या अधिकृत स्टेटस पेजवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आधारभूत DNS समस्येचे पूर्ण निराकरण करण्यात आले आहे आणि बहुतेक सेवा आता सुरळीतपणे कार्यरत आहेत.” मात्र काही विनंत्या अद्याप थोड्या धीम्या गतीने चालू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की ही समस्या त्यांच्या DynamoDB डेटाबेस सेवा प्रणालीशी संबंधित होती, जी अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील US-EAST-1 डेटा सेंटरमध्ये स्थित आहे. AWS ने सांगितले की, अजूनही जर काही वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या जाणवत असतील, तर त्यांनी आपला DNS cache क्लिअर करण्याचा सल्ला दिला आहे. या मोठ्या बिघाडाचा परिणाम जगभरातील अनेक लोकप्रिय अॅप्स आणि वेबसाइट्सवर झाला होता. यात AI स्टार्टअप Perplexity, ट्रेडिंग अॅप Robinhood, मेसेजिंग अॅप Signal, आणि क्रिप्टो एक्स्चेंज Coinbase यांचा समावेश आहे.
Perplexity चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “Perplexity सध्या डाउन आहे. मूळ कारण AWS ची तांत्रिक अडचण आहे, आम्ही ती सोडवण्यासाठी काम करत आहोत.” या यादीत Zoom, Roblox, Fortnite, Duolingo, Canva आणि Wordle सारख्या प्रसिद्ध अॅप्सचाही समावेश होता. याशिवाय, Amazon च्या स्वतःच्या वेबसाइट, Prime Video आणि Alexa सेवाही काही काळ बंद पडल्या होत्या.
Reuters वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये Uber ची प्रतिस्पर्धी कंपनी Lyft ची अॅप सेवा हजारो वापरकर्त्यांसाठी ठप्प झाली होती, तर ब्रिटनमधील अनेक बँकांच्या ग्राहकांनाही ऑनलाइन बँकिंगमध्ये अडथळे आले होते. AWS च्या या बिघाडामुळे इंटरनेटवरील प्रमुख सेवांचे जगभरात तात्पुरते नेटवर्क ठप्प झाले होते. तथापि, आता कंपनीने समस्या सोडवली असून सर्व सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याचे Amazon Web Services ने स्पष्ट केले आहे.