Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनानं नागपुरातले छोटे मोठे रस्ते रोखले..., ४ महामार्ग देखील बंद
थोडक्यात
बच्चू कडूंच्या आंदोलनानं नागपुरातले छोटे मोठे रस्ते रोखले
शेतकरी कर्जमाफी आंदोलनामुळे 4 महामार्ग बंद,
बच्चू कडूंच्या त्या अटीमुळे सरकार बॅकफूटवर येणार
शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यावेळी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरुन संभाषण झाल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर-वर्धा महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी शेतकरी आंदोलनावर ठाम असून, त्यांनी रस्त्यावरच न्याहरी केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. या आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठकीच्या स्थळावरून शाब्दिक चकमक झाली. बच्चू कडू यांनी मुंबईतील बैठकीला स्पष्ट नकार देत आपली बाजू मांडली.
बच्चू कडू काय म्हणाले?
यावेळी बच्चू कडू यांनी आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चात जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले, असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केला. यापूर्वी दोन बैठका झाल्या, पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. विमानातून जा-ये आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. तुम्ही आमचं आंदोलन बैठकीच्या नावाने मोडून काढत आहात, असा गैरसमज होतोय, असेही बच्चू कडूंनी म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितले?
तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांना मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीला येण्याची विनंती केली. मी २६, २७, २८ हे तीन दिवस बच्चू कडूंसह इतर नेत्यांशी बोलणं केलं आणि त्यानुसार बैठक लावली. त्यांनी येण्याचे कबूल केले होते, पण आता ते आले नाहीत. त्यांनी किमान एका प्रतिनिधीला तरी मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीला पाठवावे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तोडगा हा चर्चेतूनच निघतो असे सांगून त्यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही त्यांना कशाला अटक करू? आम्ही फक्त बैठकीसाठी बोलावतोय. आम्ही मुघल विचाराचे नाही, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंचा आरोप फेटाळला. बैठक लावली असताना कोणीही प्रतिनिधी न आल्याने ती रद्द करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर आणि बैठक नागपूरमध्ये घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकार मुंबईतील बैठकीसाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
