बच्चू कडूंची माघार; कारण सांगत राणा दाम्पत्यांवर केले गंभीर आरोप

बच्चू कडूंची माघार; कारण सांगत राणा दाम्पत्यांवर केले गंभीर आरोप

प्रचारसभेसाठी अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरुन अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवणीत राणा आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू होता.
Published by :
shweta walge

प्रचारसभेसाठी अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरुन अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवणीत राणा आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू होता. बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलला सायन्स कोर मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना मिळालेली परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यानंतर मैदानाच्या पाहणीसाठी गेलेल्या बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये मंगळवारी सायंकाळी बाचाबाची झाली. यानंतर आज प्रहारच्यावतीने अमरावतीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बच्चू कडू म्हणाले, “आज आमच्या रॅलीला ५० ते ७५ हजार लोक येतील. काल पेंडॉल पेटवत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती आमच्यापर्यंत आली. आमच्यावर काही दुसरे आरोप लावण्यात येण्यापेक्षा आणि निवडणुकीमध्ये ते आमच्यावर काहीही आरोप लावू शकतात”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “मला अजूनही भिती आहे की, २६ तारखेला किंवा उद्या-परवा हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते, अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे घेतली. अन्यथा रात्रीच या ठिकाणी आमचे २० ते २५ हजार कार्यकर्ते आले असते. मात्र, कोणताही डाग लागू नये, म्हणून आम्ही दोन पावलं शांततेने मागे घेतली. कायदा गृहमंत्र्यांनी तोडला आहे. त्यांनी या ठिकाणी सभा घ्यायला नव्हती पाहिजे. आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर पुन्हा आम्हाला परवानगी नाकारली आणि त्यांना दिली. ही घटना निषेधार्थ आहे”, असे बच्चू कडू म्हणाले.

“कायद्याच्या राज्यात असे झाले तर लोकांना काय संदेश जाईल. यांची दडपशाही सुरु आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. भाजपाची ही संस्कृती नाही. पण युवा स्वाभिमान पक्ष भाजपाला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे. या गोष्टीचा जे न्यायप्रिय लोक आहेत ते नक्की विचार करतील. २६ तारखेला जनता आम्हाला न्याय देईल. आम्ही यांच्या रंगबाजी विरोधात लढू. आता तर खरी लढाई सुरु झाली आहे. ही लढाई निवडणुकीपुरती नाही”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

“नवनीत राणा आणि रवी राणा यांना पराभव दिसत आहे. २३ आणि २४ ला आम्हाला मैदान मिळाले होते. २३ तारखेलाच परवानगी मिळाली होती. मात्र, २३ तारखेला दुपारी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही आणि आमचा प्रचार थांबवला. पण निवडणूक आहे म्हणून थांबलो, अन्यथा आमचा स्वभाव थांबण्याचा नाही”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com