Bacchu Kadu : 'सरकारला डोळे असून दिसत नाही!'; म्हणत 'सातबारा कोरा यात्रे'त बच्चू कडू डोळ्याला पट्टी बांधून सहभागी
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या 'सातबारा कोरा यात्रे'चा आज सातवा दिवस आहे. आतापर्यंत या पदयात्रेमार्फत 115 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण झाला आहे. आज त्यांनी डोळ्याला पट्टी बाधून पायी प्रवास केला. सरकारच्या डोळस असंवेदनशीलतेवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले की, "सरकारला डोळे असून दिसत नाही. शेतकरी मरतोय, दिव्यांग जगतोय की मरतोय, हे त्यांना दिसत नाही."
यात्रेदरम्यान विविध ठिकाणी सभांमधून बच्चू कडूंनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. "भारत माता की जय, वंदे मातरम्" अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. "दोन पाय नसणारे, डोळे नसणारे, मुकं-बधिर लोकं 15-15 महिने पगाराशिवाय जगत आहेत. हे सरकार काही निर्णय घेत नाही", अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात वारंवार मेसेज पाठवले. उत्तर होकारार्थी आलं, पण निर्णय काही झाला नाही," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
"सरकार डोळस असून अंध आहे, म्हणून आम्ही पट्टी बांधून आंदोलन करत आहोत," असं म्हणत त्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता स्पष्ट केली. "दिव्यांग कसा जगत असेल, त्याच्या वेदना कशा असतील, याची किमान दृष्टी सरकारला यायला हवी," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ही यात्रा शेतकऱ्यांचे शून्य कर्ज व दिव्यांगांच्या पगारासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधत आहे. "सातबारा कोरा" या घोषणेचा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर कोणतंही कर्ज नसलेली जमीन, हे यामागचं उद्दिष्ट.