GDP : केळीच्या उत्पादनातील वाढ; भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा
देशातील फळे आणि भाज्यांच्या एकूण उत्पादनात केळीचा वाटा 10.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. तुलनात्मकदृष्ट्या, 2022-23 मध्ये तो 10.5 टक्के आणि 2011-12 मध्ये केवळ 9 टक्के होता. यावरून स्पष्ट होते की, मागील दशकभरात केळीच्या उत्पादनात आणि अर्थव्यवस्थेतील भूमिकेत सातत्याने वाढ होत आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला असता, देशाच्या जीडीपीत केळीचा वाटा आता 2.95 टक्के इतका झाला आहे. आंबा हा 2011 ते 2022 पर्यंत या यादीत आघाडीवर होता. मात्र आता केळीने हे स्थान बळकट केलं असून, कृषी उत्पन्नात आपली पकड मजबूत केली आहे.
फक्त फळांच्याच नव्हे तर मसाल्यांच्या उत्पादनातही महत्त्वपूर्ण बदल दिसून येतो. 2017-18 पासूनच मसाले, विशेषतः मिरची, यांनी डाळींच्या तुलनेत जास्त वाटा राखला आहे. 2023-24 मध्ये मसाल्यांचा एकूण अन्न उत्पादनातील वाटा 5.9 टक्केवर पोहोचला आहे. यातील मिरचीचा वाटा एकट्या 1.32 टक्के आहे, जो शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आशादायक संकेत आहे. हे आकडे कृषी धोरण आखणाऱ्या संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. पारंपरिक पिकांच्या पलिकडे पाहून, शाश्वत आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळण्याचा विचार या आकडेवारीतून स्पष्ट होतो.