Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर
मराठी विजय दिनाच्या निमित्ताने काल पार पडलेल्या ऐतिहासिक मेळाव्यानंतर आज मुंबईत 'सेना भावना' कार्यालयासमोर ठाकरे कुटुंबाच्या एकत्रित नेतृत्वाचे प्रतीक ठरणारे बॅनर झळकले आहेत. "आजच दसरा, आजच दिवाळी" अशा उत्साहवर्धक आशयाचे हे पोस्टर्स कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्टपणे दर्शवत आहेत.
काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे व्यासपीठावरून जोरदार भाषणं करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. याच अनुषंगाने आज 'सेना भावना' कार्यालयासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह, राज-उद्धव ठाकरे आणि अमित- आदित्य ठाकरे यांचे एकत्र फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा फोटो आहे.
या पूर्वीच, "मराठी विजय दिन साजरा करण्या अगोदर ठाकरे बंधू एकत्र यावेत" अशी इच्छा असणारे पोस्टर्स मुंबईत झळकत होते. आता ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येत आनंदोत्सव साजरा करत आहेत.
या ऐतिहासिक क्षणाने ठाकरे परिवाराच्या एकतेचा संदेश दिला असून, राजकारणातही नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये सध्या अपार उत्साह असून, 'सेना भावना' कार्यालय हे त्या उत्साहाचे केंद्रबिंदू ठरत आहे.