Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक असून मुंबईकरांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड या रेल्वे स्थानकांच्या अप आणि डाऊन जल मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
तसेच, हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत पोर्ट लाईन वगळून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पनवेल आणि सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 9.45 ते संध्याकाळी 5.12 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे.
तर पनवेल आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुद्धा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत रद्द राहणार आहे. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या विरार आणि डहाणू भागात पालघर आणि बोईसर दरम्यान रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 8.30 ते 10.30 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे