Torres : टोरेसनंतर पुन्हा मोठा घोटाळा; TWJ कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक
Torres : टोरेसनंतर पुन्हा मोठा घोटाळा; TWJ कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक, 'या' जिल्ह्यात गुन्हे दाखल Torres : टोरेसनंतर पुन्हा मोठा घोटाळा; TWJ कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक, 'या' जिल्ह्यात गुन्हे दाखल

Torres : टोरेसनंतर पुन्हा मोठा घोटाळा; TWJ कंपनीकडून कोट्यवधींची फसवणूक, 'या' जिल्ह्यात गुन्हे दाखल

TWJ फसवणूक: चिपळूणमध्ये गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक उघड
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्रात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे.

  • TWJ (ट्रेड विथ जॅझ) या शेअर मार्केट कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे

  • गुंतवणूकदारांना या कंपनीने गंडा घातला असून, यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. टोरेस घोटाळ्याच्या धक्क्यातून सावरायच्या आतच, TWJ (ट्रेड विथ जॅझ) या शेअर मार्केट कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. जास्त परताव्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना या कंपनीने गंडा घातला असून, यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये गुन्हा दाखल

चिपळूणचे गुंतवणूकदार पंकज माटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, त्यांची पत्नी नेहा नार्वेकर आणि शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहितीप्रमाणे, TWJ कंपनीत राज्यभरातून जवळपास 11 हजार गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत. कंपनीच्या 20 हून अधिक शाखा महाराष्ट्रातील विविध भागात कार्यरत असल्याचेही समोर आले आहे.

गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने महिन्याला 3 ते 5 टक्के व्याजदराने परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. सुरुवातीला काही महिने परतावा मिळाला; मात्र मागील पाच महिन्यांपासून व्याज थांबल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले. यानंतर कंपनीविरोधात ठिकठिकाणी तक्रारी दाखल होऊ लागल्या.

यवतमाळमध्ये 3 कोटींची फसवणूक

यवतमाळच्या जांब रोड परिसरात TWJ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीने अनेक गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचं आमिष दाखवलं. काही काळ 3 ते 4 टक्के व्याज दिल्यानंतर अचानक कंपनीने पैसे देणं बंद केलं. गुंतवणूकदारांनी मुद्दल आणि व्याज मागितल्यावर कंपनीकडून टाळाटाळ सुरू झाली.

फिर्यादी गजेंद्र श्रावणजी गणवीर यांनी आपल्या कुटुंबासह एकूण 29 लाख रुपये गुंतवले होते. तर एकूण गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अखेर 21 सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसात समीर नार्वेकर (CMD, TWJ कंपनी), सागर मयलवार (शाखा व्यवस्थापक, यवतमाळ) आणि सुरज माडगुलवार (लेखापाल, यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.

ठाणे EOW कडून तपास सुरू

TWJ कंपनीच्या फसवणुकीचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील गुंतवणूकदारांकडून वाढत्या तक्रारींमुळे या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांमध्ये संताप

गुंतवणूकदारांनी आपली आयुष्यभराची कमाई TWJ मध्ये गुंतवली होती. मोठा परतावा मिळेल या आशेवर त्यांनी लाखो-कोट्यवधी रुपये दिले. मात्र आता पाच महिन्यांपासून व्याज बंद, मुद्दल परत न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार संतप्त झाले असून ठिकठिकाणी पोलिस ठाण्यांवर खेटे मारत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com