Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चा मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पोलिसांचे अटींसह 40 नियमांचे पत्र
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज (बुधवार) अंतरवाली सराटी (जालना) येथून मुंबईकडे कूच होणार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले असून, पहिला मुक्काम जुन्नर येथे असणार आहे. त्यानंतर राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचण्याची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे मोर्चा परवानगीशिवाय पुढे जाईल का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आंदोलक ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. राज्य सरकारकडूनही आंदोलकांना थांबविण्याचे प्रयत्न होऊ शकतात.
अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने मराठा समाज जमा झाला आहे. मसाजोग गावातून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे गावकऱ्यांसह मोर्चाला समर्थन देण्यासाठी रवाना झाले आहेत. गावातून अनेक वाहने आंदोलकांसाठी पाठविण्यात आली आहेत.
जालना पोलिसांनी मोर्चाला अटींसह परवानगी दिली आहे. आयोजकांना दिलेल्या अटींमध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे –
प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तणाव निर्माण करणारी विधाने होऊ नयेत.
मोर्चाचा मार्ग ठरवलेल्या मार्गानुसारच राहावा, बदल करता कामा नये.
ॲम्ब्युलन्स, अग्निशामक दल यांसारख्या सेवांना अडथळा निर्माण होऊ नये.
मालमत्तेची हानी झाल्यास भरपाईची जबाबदारी आयोजक व आंदोलनकर्त्यांची राहील.
सहभागी नागरिकांनी शस्त्र, दगड, ज्वलनशील पदार्थ बाळगू नयेत.याशिवाय शिस्त, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण 40 अटी लागू करण्यात आल्या आहेत.