गौंडवाड खून-जाळपोळ प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; 26 जणांना अटक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गौंडवाड गावातील देवस्थान जमिनीच्या वादातून शनिवारी रात्री एकाचा खून होण्याबरोबरच गावात दंगल उफाळून जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी खून प्रकरणी 7 जण, तर जाळपोळ प्रकरणी 19 जण अशा एकूण 26 जणांना गजाआड केले आहे. पोलिसांची धरपकड अद्यापही सुरू असून सध्या तणावाच्या वातावरणासह गौंडवाड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गौंडवाड गावातील देवस्थान जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. या वादातून यापूर्वी देखील हाणामारीच्या अनेक घटना घडल्या होता हा जुना वाद 2 वर्षांपूर्वी उफाळून आला होता. गावातील काही कुटुंब विरुद्ध ग्रामस्थ असा हा वाद आहे.
यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीमुळे गेली दोन वर्षे हा वाद शमला होता. मात्र शनिवारी पुन्हा हा वाद उफाळून आला काल रात्री 9:30 च्या सुमारास देवस्थान जमिनीसाठी ग्रामस्थांच्यावतीने लढा देणाऱ्या सतीश राजेंद्र पाटील या तरुणावर चाकू व जंबियाने हल्ला करून खून करण्यात आला. हल्यानंतर सतीश पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान याच गावालगतच्या कंग्राळी बुद्रुक गावात संतप्त जमावाने बेदम मारहाण करून नुकताच एकाचा खून केला होता. त्यानंतर दोन दिवसातच गौंडवाड गावात खुनाची घटना व दंगल उसळण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. गौंडवाड येथील घटनेची प्रतिक्रिया आणखी तीव्र उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.