OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
थोडक्यात
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्येसारखे मोठ पाऊल भरत कराड यांनी उचललं
त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ओबीसी समाजात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मराठा समाजाच्या काही युवकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. त्यानंतर, ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या भीतीतून लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील तरुण भरत कराड (वय 35) यांनी मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने ओबीसी समाजात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरत कराड यांच्या निधनानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी वांगदरी गावी जाऊन कराड कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कराड कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला पात्रतेनुसार शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे.
मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावरून हे पत्र शेअर करताना कराड कुटुंबीयांची अवस्था उघड केली. स्व. भरत कराड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी राज्य सरकारने न्याय्य मदत करावी, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
भरत कराड यांनी आत्महत्या करताना "ओबीसी आरक्षण वाचवा" अशा घोषणा दिल्या होत्या. ते लहानपणापासूनच ओबीसी समाजाच्या आंदोलनात सक्रिय होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांच्या मृत्यूनंतर नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची तातडीची मदत कुटुंबाला देण्यात आली आहे. परंतु, इतक्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी शासकीय पातळीवर अधिक ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
"सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सजग आहे. संविधानाच्या चौकटीत राहून न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला जाईल. पण आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये," असे आवाहनही मुंडे यांनी केले.
दरम्यान, भरत कराड यांच्या आत्महत्येच्या घटनेने आरक्षणाच्या चळवळीवर मोठा परिणाम झाला असून, सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून होत आहे.