Bharati Pawar has passed away : भारती पवार यांचे दुःखद निधन! पवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर
शरद पवार यांचे लहान बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार यांचं निधन झालं आहे. गेले काही महिने त्या आजारी होत्या. पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी पुण्यात दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण होत्या भारती पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे आज निधन झाले. प्रतापराव पवार हे सकाळचे अध्यक्ष असून त्यांचा मुलगा अभिजित पवार सकाळचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारती पवार ह्या मुळच्या मुंबईच्या असून त्यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले आहे. त्यांनी बालमोहन विद्या मंदिर येथे त्यांचे प्रथमिक शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयातून झाले असून त्या चित्रकलेत तरबेज असल्यामुळे त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह 22 ऑगस्ट 1970 ला प्रतापराव पवार यांच्याशी झाला. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्या औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्षे सक्रिय होत्या. तसेच पुण्यात आल्यावर सकाळच्या माध्यमातून अनेक उपक्रमांत सहभागी व्हायच्या
सुप्रिया सुळेंची पोस्ट
या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली".