Uddhav Thackeray: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना धक्का! जिल्हाप्रमुख शिंदेसेनेच्या वाटेवर

Uddhav Thackeray: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना धक्का! जिल्हाप्रमुख शिंदेसेनेच्या वाटेवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत. विशेष म्हणजे, नुकताच मराठवाड्याचा दौरा करून गेलेल्या उद्धव ठाकरेंना आता मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत. विशेष म्हणजे, नुकताच मराठवाड्याचा दौरा करून गेलेल्या उद्धव ठाकरेंना आता मोठा राजकीय धक्का बसला आहे. जालना जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी पक्षत्याग करत थेट शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) प्रवेश केला आहे. हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरला असून, मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकतो.

जालना ठरलं राजकीय केंद्रबिंदू

जालना जिल्हा, जो गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे चर्चेत होता, पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट देत सरकारवर हल्लाबोल केला होता. मात्र, काही दिवसांतच त्यांच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनीच पाठी फिरवल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आंबेकर यांच्या प्रवेशावेळी शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते अर्जुन खोतकरही उपस्थित होते. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती, आणि “एकच वाघ – शिंदे साहेब!” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं.

“वर्षानुवर्षे थांबवलं, अपमान केला” – आंबेकर यांचा संताप

भास्कर आंबेकर यांनी पक्षत्यागाचे कारण सांगताना ठाकरे गटाविषयी आपला संताप स्पष्टपणे व्यक्त केला. ते म्हणाले, “मी गावागावात शिवसेनेच्या शाखा उभारल्या, जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. 1990 पासून उमेदवारी मागत होतो, पण प्रत्येकवेळी फसवणूक झाली. 2014 मध्ये विधानपरिषद देऊ असं सांगितलं, शेवटी महामंडळ देऊन थांबवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर तेही बरखास्त केलं. माझ्या मेहनतीचा, निष्ठेचा अपमान झाला.”

आंबेकर पुढे म्हणाले,

“या ताणतणावामुळे मला हृदयविकाराचा झटका आला, पण कोणीच विचारपूस केली नाही. मात्र अर्जुन खोतकर माझ्यासाठी तत्काळ धावून आले. नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः फोन करून तब्येतीची विचारपूस केली. त्यांचं माणुसकीचं वागणं मला भावलं आणि मी आज त्यांच्या शिवसेनेत आलो.”

शिंदेंचा मराठवाड्यात पुन्हा ‘गेमचेंजर’ डाव

भास्कर आंबेकर यांचा पक्षप्रवेश हा केवळ स्थानिक स्तरावरचा बदल नाही, तर मराठवाड्यात शिंदे गटाची पकड मजबूत करण्याचा मोठा राजकीय डाव म्हणून पाहिला जातो. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मराठवाड्याचा दौरा करत ठाकरे गटाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखानेच गट सोडल्याने या दौऱ्याचा परिणाम कमी पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “शिवसेना ही विचारांची आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची सेना आहे. ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांचा सन्मान करणे ही आमची परंपरा आहे. आंबेकरांसारखे निष्ठावान कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत, ही खरी शिवसेनेची ताकद आहे.”

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढली खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांत पक्षांतराला वेग आला आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र येत आहेत, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढतीचा नारा दिला जात आहे. अशात भास्कर आंबेकर यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी मानसिक आघात ठरला आहे.

राजकीय समीकरणात बदलाची चाहूल

मराठवाड्यातील शिवसेनेच्या संघटनेवर आंबेकर यांचा प्रभाव मोठा असल्याने अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.आगामी काही दिवसांत मराठवाड्यात आणखी काही मोठे नेते शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sumerry

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत.

  • भास्कर आंबेकर यांनी पक्षत्यागाचे कारण सांगताना ठाकरे गटाविषयी आपला संताप स्पष्टपणे व्यक्त केला

  • मराठवाड्यातील शिवसेनेच्या संघटनेवर आंबेकर यांचा प्रभाव मोठा असल्याने अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com