Bilawal Bhutto's Threat To India : "...तर पाकिस्तानची युद्धासाठी सज्ज होईल" भारताच्या 'त्या' निर्णयाने पाकिस्तान संतप्त; बिलावल भुट्टोंची भारताला धमकी
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. सिंधु नदीवर धरण बांधणे किंवा 1960 च्या सिंधु जलसंधीत बदल करणे हा पाकिस्तानसाठी युद्धाचा विषय ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच सिंधु जलसंधी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.
ही घडामोड जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरची आहे, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली. अमित शाह यांनी भारत आता ही संधी कधीही पुन्हा बहाल करणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या नेतृत्वात संतापाची लाट उसळली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना बिलावल भुट्टो यांनी म्हटले की, " सिंधु नदीचे पाणी वळवणे हे पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या संस्कृती आणि सभ्यतेवर थेट आघात आहे. भारताची जलनीती ही आक्रमक असून त्यामुळे पाकिस्तानच्या जलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल", असा आरोप त्यांनी केला.
भुट्टो यांनी सांगितले की परराष्ट्र दौऱ्यांमध्येही त्यांनी या मुद्द्याला महत्त्व दिले आहे. हा पाकिस्तानच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे, असे ते म्हणाले. "भारताने कोणताही आक्रमक पाऊल उचलल्यास पाकिस्तानची जनता युद्धासाठी सज्ज आहे आणि युद्ध झाल्यास पाकिस्तान आपल्यातील सर्व सहा नद्यांवर पुन्हा अधिकार प्रस्थापित करेल", असा इशारा त्यांनी दिला. भारताने सिंधु जलसंधीवर घेतलेला कठोर निर्णय आणि त्यावर पाकिस्तानकडून आलेली ही तीव्र प्रतिक्रिया यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.