Harbour Railway : हार्बर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; 26 जानेवारीपासून धावणार एसी लोकल
मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे सेवा दिवस-रात्र अविरत धावत असते. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीन प्रमुख मार्गांवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. कार्यालयीन कामासाठी जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणारे नागरिक या लोकल सेवेवर अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. मात्र हार्बर मार्गावरील प्रवाशांना आजवर या सुविधेपासून वंचित राहावे लागले होते.
आता मात्र हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या 26 जानेवारीपासून, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल धावणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही सेवा सुरू केली जाणार असून त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास ‘गारेगार’ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल या मार्गावर सोमवार ते शनिवार दरम्यान एसी लोकलच्या दररोज 14 फेऱ्या धावणार आहेत. अप आणि डाऊन दिशेने प्रत्येकी 7 फेऱ्या असतील. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही एसी लोकल मूळतः चेन्नई येथून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दाखल झाली होती. हार्बर मार्गावर एसी लोकल चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या ऑपरेशन विभागाने मुख्यालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाल्याने हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या वेळापत्रकानुसार, वाशी–वडाळा रोड, पनवेल–वडाळा रोड आणि पनवेल–CSMT या मार्गांवर एसी लोकल धावणार आहे. पनवेल येथून संध्याकाळी 6.37 वाजता शेवटची एसी लोकल CSMTच्या दिशेने सुटेल, तर CSMTहून रात्री 8 वाजता पनवेलच्या दिशेने शेवटची लोकल धावेल. गर्दी, उकाडा आणि दमट हवामानात प्रवास करणाऱ्या हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. अनेक वर्षांपासून असलेली एसी लोकलची मागणी अखेर पूर्ण होत असून, हार्बर रेल्वे प्रवाशांना आता अधिक सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
