Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक
पुणेकरांसाठी आणि गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या गणेशोत्सव काळात पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, राज्य सरकारने गणेशोत्सवाला नुकताच राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पुण्यात देशविदेशातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. शहरातील प्रमुख गणेश मंडळांमध्ये जाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित तसेच सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे मेट्रोने वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे.
सध्या पुण्यात जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गावरील जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही पाच स्थानके सुरु झाली आहेत. ही स्थानके शहरातील प्रमुख गणपती मंडळांच्या जवळ असल्याने, भाविकांना थेट मेट्रोमार्गे मुख्य मंडपांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत, म्हणजेच २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत धावणार आहे. यानंतर ३० ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबर या काळात मेट्रोची सेवा पहाटे ६ पासून थेट रात्री २ वाजेपर्यंत सुरु राहील. भाविकांच्या सर्वात मोठ्या गर्दीच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला, मेट्रो प्रशासनाने तब्बल ४१ तास अखंड सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सेवा सुरु होईल आणि ती ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सलग सुरु राहील.
पुणेकरांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून, गणेशभक्तांना वेळ वाचवत थेट बाप्पाच्या दर्शनाला जाण्याची मुभा मिळणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ८ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार सुरु राहील.
गणेशोत्सव काळात वाढीव फेऱ्या, वाढीव सेवा वेळ आणि विशेषतः अखंड सेवा उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयामुळे पुण्यातील वाहतूक भार कमी होण्यास मदत होणार असून, लाखो गणेशभक्तांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.