Vice-Presidential Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक; बीजेडी आणि बीआरएस तटस्थ राहणार
थोडक्यात
आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत
बीजेडी आणि बीआरएस तटस्थ राहणार
( Vice-Presidential Election ) आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण 782 खासदार मतदान करणार असून त्यामध्ये लोकसभेतील 543, राज्यसभेतील 233 आणि 12 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. यातच आता ओडिशातील बीजू जनता दल (BJD) आणि तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) या दोन प्रादेशिक पक्षांनी आपली स्वतंत्र भूमिका जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांनी मतदान प्रक्रियेत सहभागी न होता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, एनडीए आणि इंडिया (I.N.D.I.A.) या राष्ट्रीय आघाड्यांपासून हे पक्ष आधीपासूनच दूर आहेत.
बीजेडीने स्पष्ट केले आहे की त्यांचे लक्ष केवळ ओडिशातील विकास आणि तेथील जनतेच्या कल्याणावर आहे. पक्षाने म्हटले की ते ना सत्ताधारी आघाडीसोबत जाणार ना विरोधी आघाडीसोबत. याआधी बीजेडीने अनेकवेळा केंद्रातील सरकारला समर्थन दिले होते, परंतु यावेळी त्यांनी दोन्हीकडून अंतर राखले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर बीजेडी आता विरोधी बाकावर असून, त्यांच्या या निर्णयाला राजकीय रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे.
दुसरीकडे, तेलंगणातील बीआरएसने तटस्थतेचा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणींशी जोडला आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी सांगितले की, राज्यात युरियाचा गंभीर तुटवडा आहे आणि त्यावर भाजप व काँग्रेस दोन्ही पक्ष अपयशी ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना अधोरेखित करण्यासाठी बीआरएसने निवडणुकीपासून दूर राहणे निवडले. त्यांच्या मते, जर ‘नोटा’चा पर्याय असता तर त्याचा विचार केला असता. या दोन पक्षांच्या निर्णयामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
