Ladki Bahin Yojana : निवडणुकीआधीच दिलासा? लाडकी बहिणींना 3000 रुपयांचा शब्द; तेजस्वी घोसाळकरांचा दावा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत “लाडकी बहीण योजना” पुन्हा चर्चेत आली आहे. अद्याप डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून दहिसरमधील भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केला आहे.
तेजस्वी घोसाळकर यांच्या म्हणण्यानुसार, लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. १४ जानेवारी रोजी पात्र महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये जमा होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
बीएमसी निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून सर्वच पक्ष मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच तेजस्वी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महिलांना ही माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात सरकार महिलांना दिलासा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दहिसर वॉर्ड क्रमांक २ मध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा सामना ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोळगे यांच्याशी होत आहे. या वॉर्डमध्ये राजकीय समीकरणे बदललेली दिसत असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

