Pankaja Munde : ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचा बोलबाला; विकास हाच आमचा अजेंडा’  नांदेडमध्ये पंकजा मुंडेंचा ठाम दावा

Pankaja Munde : ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचा बोलबाला; विकास हाच आमचा अजेंडा’ नांदेडमध्ये पंकजा मुंडेंचा ठाम दावा

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची विश्वासार्ह सत्ता उभी आहे आणि ती केवळ घोषणांवर नव्हे, तर प्रत्यक्ष विकासकामांवर उभी आहे, असा ठाम विश्वास भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची विश्वासार्ह सत्ता उभी आहे आणि ती केवळ घोषणांवर नव्हे, तर प्रत्यक्ष विकासकामांवर उभी आहे, असा ठाम विश्वास भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला. “प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्यावर जर हनुमान जागा होतो, तर विकासाचं नाव घेतल्यावर जनतेचा विश्वास आपोआप भाजपवर बसतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नांदेडमध्ये भाजपची संपूर्ण टीम सक्षम असून, अनुभवी नेते अशोक रावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशाने आणि राज्याने अनेक सरकारे पाहिली, अनेक नेत्यांनी मोठी पदे भूषवली; मात्र गरिबांच्या कल्याणाला आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व भाजपने दिले. “आमच्यासाठी विकास हा केवळ शब्द नाही, तो आमचा केंद्रबिंदू आहे. गरिबाच्या घरात पाणी कोणी दिलं? घरापर्यंत रस्ता कोणी आणला? गटार कोण साफ करतं? ‘लाडकी बहीण’ योजनेतून नियमित आर्थिक मदत कोण देतं? या प्रश्नांची उत्तरं लोकांना आता स्पष्ट दिसत आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सभेत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवरही त्यांनी जोरदार भाष्य केले. “भाजपला मत दिलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल, असे काहीजण सांगत आहेत. पण राज्यात मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना कशी बंद होईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि जनतेला कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.

आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण विकास, महिला व बाल विकास, रोजगार आणि जलसंधारण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. “जलयुक्त शिवार, टँकरमुक्त जिल्हे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या या योजना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांसाठीही आदर्श ठरल्या,” असे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या भूमिकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आता मला निसर्गाची सेवा करण्याची जबाबदारी मिळाली आहे. कारण निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल. करोडो रुपये असले तरी हवेत ऑक्सिजन नसेल, तर श्रीमंत आणि गरीब दोघेही तडपडून मरतील.” नांदेडमध्ये प्रदूषणमुक्त नद्या, स्वच्छ हवा आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनासाठी मोठे प्रकल्प राबवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नांदेडचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी आपले भाषण संपवले. विकास, विश्वास आणि पर्यावरण संरक्षण या त्रिसूत्रीवर भाजपची वाटचाल सुरू राहील, असा ठाम संदेश त्यांनी या सभेतून दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com