Nitesh Rane On Sanjay Raut's Book : 'अपूर्ण पुस्तक संजय राऊत यांनी लिहू नये, पूर्ण पुस्तक काढा'; नितेश राणेंचा खोचक टोला
संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' ( Sanjay Raut Book Narkatla Swarg ) या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे. मात्र त्या आधीच या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात चर्चासत्र रंगल आहे. विविध स्तरातील राजकीय नेत्यांकडून पुस्तकासंबंधी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. विरोधकांनी संजय राऊत यांच्या पुस्तकातील मजकुराबाबत टीका केली असून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अनेक गौप्यस्फोट या निमित्ताने केले आहे. त्यांनी संजय राऊत यांना अनेक मुद्दे पुस्तकात नमूद करायचे राहिले असल्याची आठवण करून दिली.
नितेश राणे म्हणाले की, "पुस्तकामध्ये काही पाने लिहायचे राहिली असतील. संजय राऊत जेलमध्ये असताना त्याने उद्धव ठाकरे यांना अनेक शिव्या घातल्या. त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरले आहेत. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांची कोणाकोणासमोर लायकी काढली, त्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात करावा. नुसतं प्रेम बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर का दाखवता? उद्धव ठाकरे यांना पोहोचवून दाखवतो, एवढी सांगण्याची हिंमत संजय राऊत यांनी केली होती. त्याचा उल्लेख पुस्तकात का केला नाही? त्यामुळे अपूर्ण पुस्तक संजय राऊत यांनी लिहू नये, पूर्ण पुस्तक काढा. मग त्यांना नरकात पोहोचवायचं काम उद्धव ठाकरेचं करतील."