Manoj Tiwari On Raj Thackeray : मनोज तिवारींचा राज ठाकरेंवर घणाघात; “मराठी संस्कृतीचा अनादर करणाऱ्याला...”
भाजप खासदार आणि लोकप्रिय अभिनेते मनोज तिवारी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मराठी भाषा आणि संस्कृतीचा खरा सन्मान भारतीय जनता पार्टी करते. पण राज ठाकरे यांसारखे नेते मात्र केवळ बोलून मराठी अस्मितेचा वापर करतात आणि प्रत्यक्षात मराठी संस्कृतीचा अपमान करतात,” असा आरोप तिवारी यांनी केला.
एका खासगी टीव्ही चॅनलवरील चर्चासत्रात बोलताना तिवारी यांनी मराठी अस्मिता, कावड यात्रा आणि सध्या सुरू असलेल्या सावन महिन्यातील धार्मिक वादांवर स्पष्ट भूमिका मांडली. तिवारी म्हणाले, “कावड यात्रा ही लाखो लोकांच्या श्रद्धेची, भक्तीची आणि शुद्धतेची परंपरा आहे. मी स्वतः सुलतानगंज (बिहार) येथून पवित्र जल घेऊन देवघरपर्यंत ही यात्रा करणार आहे. लोकांनी यात सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. यात जर कुणी अराजकता निर्माण करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
राज ठाकरे यांच्यावर घणाघात करताना मनोज तिवारी म्हणाले, “राज ठाकरे हे लोकांना भाषणांतून फसवतात. जेव्हा एखादा नेता स्वतःच आपल्या राज्याच्या संस्कृतीचा अनादर करतो, तेव्हा त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मराठी अस्मितेचे खरे रक्षण करणारे आम्ही आहोत, केवळ ‘मराठी’चा नारा देऊन स्वतःच मराठीपणाला कलंक लावणाऱ्यांना जनता ओळखते.”
श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान घडणाऱ्या काही अनुशासित घटनांवरही तिवारी यांनी भूमिका स्पष्ट केली. “उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने कावड यात्रेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर एफआयआर दाखल केले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा, गोंधळ यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही एक पवित्र यात्रा आहे, आणि तिचं पावित्र्य जपणं आपली जबाबदारी आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या श्रावण महिन्यात धार्मिक भावना अत्यंत तीव्र असताना अशा वक्तव्यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं आहे. मनोज तिवारी यांच्या या विधानामुळे भाजपा-मनसे यांच्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.