Ravindra Chavan : ‘राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीची सत्ता’, भाजप प्रदेशाध्यक्षांचा विश्वास
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा दावा करत, राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुतीने राज्यभर जोरदार प्रचार केला आहे. या प्रचाराला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, “राज्यातील २९ महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसणार, याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, महायुतीने विकास, स्थैर्य आणि सुशासनाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर भूमिका मांडली आहे. पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक यांसारख्या मुद्द्यांवर महायुती ठोस काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारांनीही या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास दाखवला असून, त्याचे प्रतिबिंब निकालात दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दोन्ही आघाड्यांनी युती करून निवडणूक लढवली आहे, तर काही महानगरपालिकांमध्ये घटक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरातील राजकीय समीकरण वेगवेगळे असल्याचे चित्र आहे.
विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक यंदा अधिक लक्षवेधी ठरली आहे. मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. त्यामुळे मुंबईत महायुती, महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंच्या युतीत तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल उद्या, १६ जानेवारी रोजी जाहीर होणार असून, महायुतीचा दावा कितपत खरा ठरतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
