Mahayuti: महायुतीच्या जागावाटपावर भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र असंतोष
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महायुतीत पहिल्यांदाच उघड तणाव समोर आला आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला असून, यामुळे केडीएमसीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दीर्घकाळ सुरू असलेल्या बैठका, चर्चा आणि पडद्यामागील वाटाघाटीनंतर अखेर शिवसेना–भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. त्यानुसार शिवसेनेला 67 तर भाजपाला 54 जागा देण्यावर सहमती झाली. मात्र, या फॉर्म्युल्यात कल्याण पूर्व विभागात भाजपाला केवळ सात जागा मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
आमदारांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी
या नाराजीचा उद्रेक थेट रस्त्यावर पाहायला मिळाला. काल रात्री भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाले. “कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका”, “न्याय मिळाला नाही तर कल्याण पूर्वमध्ये भाजप स्वबळावर लढेल” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते.
कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्याचा आरोप
जागावाटप करताना वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, असा थेट आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. मित्रपक्षांमुळे आमची कोंडी होत असून, मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना त्यांनी मांडली. या सगळ्या नाराजीबाबत जिल्हाध्यक्ष नंदुरबार परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या.
यावेळी नाना सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत आम्ही त्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे त्यांनी मान्य केले आणि यावर वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केले. मात्र, समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही कार्यकर्त्यांची नाराजी काही केल्या कमी होताना दिसली नाही.
महायुतीत मतभेद वाढण्याची चिन्हे
फॉर्म्युला ठरला असला तरी त्यातून निर्माण झालेला असंतोष पाहता शिवसेना–भाजपमधील अंतर्गत वाद अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी दिवसांत महायुतीचे वरिष्ठ नेते या तणावावर तोडगा काढतात की वाद आणखी चिघळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मुलाखतींना वेग
दरम्यान, दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगात सुरू आहे. केडीएमसी 2026 निवडणुकीसाठी कल्याण पश्चिम विभागात दहा पॅनलसाठी तब्बल 166 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. युतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी दिली.
‘जागावाटपाची माहिती खोटी’ – गोपाळ लांडगे
जागावाटपाबाबत सध्या जे काही वृत्त पसरत आहे ते खोटे असल्याचा दावा लांडगे यांनी केला. महायुतीतील वरिष्ठ नेते अजूनही चर्चा करत असून, अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे सिटिंग जागा आहेत, त्यांनाच त्या मिळतील. भाजपमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या जागा दिल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
30 तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांची मुदत असून, त्यापूर्वी योग्य उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वार्डनिहाय चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि महायुतीचाच महापौर होईल, असा ठाम विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला.
एकीकडे भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष, तर दुसरीकडे शिवसेनेचा आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर केडीएमसी निवडणुकीतील महायुतीची पुढची वाटचाल कशी असेल, हे पाहणे आता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

