वर्ध्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार जाहीर मात्र मविआमध्ये पेच कायम
भूपेश बारंगे,वर्धा : राज्यात सत्ताधारी पक्षाकडून अनेक लोकसभा उमेदवार निश्चित झाले असून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मविआमध्ये अजूनही तिढा कायम असल्याचे सांगितलं जात आहे. तर भाजप दिल्लीवारी करत बैठकांवर बैठक सुरू असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार लवकरच घोषित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीच्या युतीचा उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर झाली असून मविआमध्ये मात्र तिढा कायम आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. सन २०१४ नंतर येथे दोनदा भाजपचे खासदार विजयी झाले. यावेळेस तिसऱ्यांदा भाजपचे रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपातच अंतर्गत नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. त्यात मविआ गटाचा उमेदवार जाहीर होत नसल्याने मविआमध्ये चढाओढ सुरू असल्याचे म्हटले जात आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असावा यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबई आणि दिल्लीवारी केली. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाली आहे.
मविआची उमेदवारी कधी जाहीर होईल याकडे आता मतदार संघाचे लक्ष लागले आहे. दहा वर्ष केंद्रात सत्ता असताना सत्ताधारी यांनी उमेदवारी जाहीर करून टाकली मात्र मविआची उमेदवारी अजूनही जाहीर होण्यास विलंब का होत आहे? जातीय समिकरणाची शरद पवार गटाकडून जुळवाजुळव केली तर जात नाही ना? असेही बोलले जात आहे.
मविआमधून यांच्या नावाची चर्चा
वर्धा लोकसभा मतदारसंघात चारुलता टोकस, हर्षवर्धन देशमुख, राजू तिमांडे, नितेश कराळे, अमर काळे आणि शैलेश अग्रवाल मविआमधून उमेदवारी मिळण्यासाठी बाशिंग बांधून असल्याचे दिसून येत आहे. वर्ध्यात भाजप आणि काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असताना हा मतदारसंघ मविआ गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने माजी आमदार अमर काळे काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची इच्छा दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. त्यांना शरद पवार गटांच्या तुतारी वर उमेदवारी घ्यावी असा आग्रह केला आहे. मात्र यावर माजी आमदार अमर काळे यांनी मौन बाळगले असून कार्यकर्त्यांना भेटून यावर तोडगा काढणार आहे.
शरद पवारांशी आतापर्यंत यांनी घेतली भेट
वर्धा लोकसभा निवडणुकीत मविआकडून इच्छूक असलेले उमेदवार हर्षवर्धन देशमुख, नितेश कराळे, अमर काळे, सुरेश देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे. यातून कोणाला उमेदवारी मिळते? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
जातीय समीकरणावर शरद पवारांचा डोळा
वर्धा लोकसभा मतदारसंघ हा तेली व कुणबी समाज मतदार बलाबल आहेत. यातून भाजपने तेली समाज प्रभुत्व बघता रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यांच्या विरोधात कुणबी समाजाला शरद पवार गटाकडून चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत कुणबी समाजातील चार ते पाच नेत्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला गेला आहे. शरद पवार हे राजकारणात जातीय समीकरण जुडवण्यासाठी प्राबल्य असल्याने येथे कुणबी समाजाचा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अजूनही मविआ गटाला उमेदवार मिळाला नसून भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात करून लोकसभा मतदार संघात बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.