BMC Election: मुंबईत सत्ता कोणाची? निकालासाठी शहर सज्ज; ‘या’ 23 ठिकाणी मतमोजणी
मुंबई महापालिका निवडणुकांचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून अवघ्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यासाठी निवडणूक यंत्रणेनं कंबर कसली असून संपूर्ण मुंबईत मतमोजणीची सुसज्ज तयारी करण्यात आली आहे.
मुंबईत एकूण 23 ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई अशा सर्व भागांमध्ये स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था आहे. दहिसर, बोरीवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सायन, दादर, वरळी, भायखळा यांसारख्या प्रमुख परिसरांमध्ये मतमोजणी होणार आहे.
प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे निवडणूक अधिकारी नेमण्यात आले असून सुरक्षा आणि पारदर्शकतेला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मुंबईकरांसाठी हा निकाल निर्णायक ठरणार आहे. शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे 16 जानेवारीला स्पष्ट होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे.

