Chandrashekhar Bawankule : मुंबईकरांचा निर्णय! ठाकरे बंधुंना का नाकारलं? बावनकुळेंनी दिलं थोडक्यात उत्तर
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत कामगिरी केली आहे. बहुसंख्य महापालिकांवर भाजप आघाडीवर आहे. विशेष लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही महायुतीचा विजय स्पष्ट दिसत आहे. यावर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
बावनकुळे म्हणाले, “डबल इंजिन सरकार म्हणजे मोदी आणि देवेंद्र यांचे नेतृत्व, त्यामुळे राज्याचा वेगवान विकास शक्य झाला. हा निकाल विकासावर आणि जनतेच्या विश्वासावर आधारित आहे. महायुतीला अंदाजे दोन तृतियांश बहुमत मिळेल.”
मुंबईत ठाकरे बंधूंचा पराभव का झाला याबाबत बावनकुळे म्हणाले, “लोकांनी डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला. उद्धव आणि राज ठाकरेंची युती, शरद पवारांची राष्ट्रवादी यांनाही साथ असली, तरीही मतदारांनी महायुतीला पसंती दिली.”
सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत महायुती 130 जागांवर आघाडीवर आहे, तर ठाकरे गट 71 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर पदाची शक्यता मजबूत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्येही भाजपने दणदणीत यश मिळवले असून, राज्यातील अनेक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.

