Sangli
Sangli Team Lokshahi

सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीत रंगला पोलीस आणि वारांगणांचा भाऊबीज सोहळा

पोलिसांना भाऊ मानत वारांगना महिलांनी केली भाऊबीज साजरी
Published by :
Sagar Pradhan

संजय देसाई|सांगली: सुंदरनगर वेश्यावस्तीत पोलीस आणि वारांगणांचा भाऊबीज सोहळा रंगला. यावेळी पोलिसांना भाऊ मानत वारांगना महिलांनी आपली भाऊबीज साजरी केली. या अनोख्या भाऊबिजेने वातावरण भावनिक बनले होते. सुंदरनगर येथील वेश्या वस्तीत वेगवेगळ्या भागातील महिला राहतात. परिस्थितीने हा व्यवसाय पत्करावा लागल्याने या महिला आपल्या घरी जाऊ शकत नाहीत.

अशा परिस्थितीत जगणाऱ्या या वारांगना महिलांना सुधा समाजातील सर्व सार्वजनिक उत्सव साजरे करता यावेत यासाठी सांगलीतील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राकडून विविध कार्यक्रम सुंदर नगर वेश्या वस्तीत या महिलासाठी आयोजित केले जातात. केंद्राचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि जमीर कुरणे यांच्या माध्यमातून आज पोलीस आणि वारांगना यांच्यातील भाऊ बीज सोहळा चांगलाच रंगला.

यावेळी या महिलांनी पोलिसांना आपले भाऊ मानत त्यांना ओवळत त्यांच्याकडून रक्षणाची ओवाळणी मागितली. या हृदयस्पर्शी कार्यक्रमास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी,स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, सादिक शेख आदी उपस्थित होते. या हृदयस्पर्शी कार्यक्रमामुळे सुंदर नगर मधील वातावरण चांगलेच भावनिक बनले होते. कार्यक्रमानंतर सर्व वारांगना महिलांना दीपावली फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com