Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनीमध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. ओम संजय राठोड वयवर्षे 20 असलेल्या सीएच्या विद्यार्थ्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आणला. यात भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
ओम हुशार विद्यार्थी होता. दहावीत त्याला 93 टक्के गुण मिळाले होते. तो सीएच्या अभ्यासासाठी मेहनत घेत होता. आई आणि बहीण मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेल्याने घरात फक्त वडील आणि ओम होते. ओम महाविद्यालय दूर असल्याने काकांच्या घरी वास्तव्यास होता.
बुधवारी दुपारी तो वडिलांसोबत घराबाहेर पडला. त्यानंतर चार्जर घ्यायचं आहे, असं सांगून तो काकांच्या घरी आला. काकूसोबत गप्पा मारल्यानंतर त्याने वडिलांना फोन करून “जेवण केले का, काळजी घ्या” असे सांगितले. थोड्याच वेळाने काकू घराबाहेर गेल्या आणि परतल्यावर ओमला आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. एवढ्यात घरातून मोठा स्फोट झाला.
शेजारी धाव घेऊन आत गेले असता, किचनमध्ये ओम आगीत जळत असल्याचे दिसले. अंगावर बेडशीट टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याला गंभीर भाजल्या अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तपासात किचनमधील गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर काढून त्यात कात्री अडकवली असल्याचे आढळले. घराचे दरवाजे-खिडक्या बंद असल्याने आग पसरून मोठा स्फोट होण्याचा धोका वाढला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.