Gold Rate : देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; खरेदीदार सावध भूमिकेत
देशभरात आज सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये स्थिरता दिसून आली असून, किरकोळ घट असूनही बाजारात खरेदीदारांची सावध भूमिका कायम आहे. सणासुदीचा हंगाम सुरू असला तरी विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या दरांमुळे मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी पुढे ढकलली जात आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतींनी स्थिरतेचा कल दाखवला. रक्षाबंधनाच्या दिवशी किंचित घट झाल्यानंतर उर्वरित दिवसांत भाव वाढले होते. आज मात्र दरात विशेष चढउतार झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात काल झालेल्या नफा बुकिंगमुळे स्पॉट सोन्याच्या भावावर दबाव राहिला असून, ते प्रति औंस 3,400 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. हा भाव अद्याप सर्वकालीन उच्चांकाच्या जवळच आहे.
सोन्याचे आजचे दर
देशात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,03,040 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 94,450 रुपये तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कायम आहे. चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही हेच दर लागू आहेत.
दर पुन्हा वाढण्याची शक्यता
गुड रिटर्न्सच्या अहवालानुसार, भारतीय बाजारात सोन्याचे दर आगामी काळात निश्चित श्रेणीतच राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कर धोरणातील बदल आणि फेडरल रिझर्व्हवरील दबावामुळे व्याजदर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. कमी व्याजदराच्या वातावरणाचा फायदा सोन्याला होऊ शकतो. यंदा आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, भू-राजकीय तणाव आणि व्यापारी संघर्षामुळे दरवाढीला चालना मिळाली आहे.
चांदीची स्थिती
Goldprice.org च्या आकडेवारीनुसार, सध्या स्पॉट चांदी 0.41 टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस 38.34 डॉलर्सवर व्यवहार करत आहे. देशात मात्र दर स्थिर असून, एक किलो चांदीची किंमत 1,17,000 रुपये आणि 100 ग्रॅमसाठी 11,700 रुपये आहे.
दरांच्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहक काहीसा थांबलेला दृष्टिकोन ठेवत आहेत, मात्र आगामी बाजारस्थितीनुसार भाव पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.