'ठगो का मेला' उद्धव ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचा पलटवार

'ठगो का मेला' उद्धव ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन करण्यात आलं आहे. या महारॅलीआधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक रोख्यांबाबतचे भाजपाचे बिंग फुटले. त्यामुळे या निवडणूक रोख्यांवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे सांगित हल्लाबोल केला. यावरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी ठाकरे दिल्लीत असं ट्विट करत पलटवार केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट

मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला.फडणवीसांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर '100 कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“देशामध्ये सुरू असेलेल्या हुकुमशाही विरोधात कशा प्रकारे एकत्र येता येईल, याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत मला भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी सांगत होते. यावर आमची चर्चादेखील झाली होती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन यांच्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यामुळे आपल्याकडे हुकुमशाही येईल अशी भिती नाही, तर हुकुमशाही आलेली आहे. अनेक व्यक्ती अशा आहेत, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते. त्यानंतर त्यांनाच पक्षात घेत त्यांच्यावरील केस रद्द केल्या. दुसरीकडे जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर केस टाकल्या जातात आणि तुरुंगामध्ये बंद केले जाते. ही चांगली लोकशाही नाही. या हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर येऊन करणार आहोत. याबाबत सर्वांच्या मनात संताप आहे “, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com