Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेबाबत बावनकुळे म्हणाले; "देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडून..."

मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे.
Published by :

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis : आमची बैठक संपल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील पुढील निवडणुकीसाठी आणि संघटनेसाठी पूर्ण वेळ देऊ, त्यासाठी मी केंद्राची परवानगी घेईल, असंही त्यांनी विधान केलं आहे. फडणवीसांची भूमिका संघटनेसाठी नेहमीच महत्त्वाची असते. सरकारच्या बाहेर पूर्ण वेळ संघटनेसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. तशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही सर्व कोअर कमिटीचे सदस्य त्याठिकाणी आहोत. त्यांनी सरकारच्या बाहेर पडून काम करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, आम्ही या मानसिकतेचे आहोत. सरकारमध्ये काम करूनही संघटनेला वेळ देता येते. आमची संघटना पुन्हा ताकदीनं उभी राहू शकते, अशी सर्वांचीच मानसिकता आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बावनकुळे पुढे म्हणाले, आम्ही त्यांना विनंती केली की, संघटनेत आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून खूप काम करण्याची गरज आहे. त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला बळ आणि संरक्षण द्यावं. आमच्या संघटनेला महाराष्ट्रात, मुंबईत गरज आहे. फणडणवीस जो पर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या पाठिशी उभे राहत नाही, तोपर्यंत आम्ही आणखी उर्जेने काम करू शकणार नाही. त्यांच्या मनात आलेलं दु:ख आणि भावना त्यांनी व्यक्त केली.

मी केंद्राशी बोलेल आणि त्यानंतर पुढच्या निर्णयाचा विचार करेन. फडणवीसांनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करण्याची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करावी. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आमच्या कोअर ग्रुपचा निर्णय ते मान्य करतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com