Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकांत गोंधळ; शाई पुसली, ईव्हीएमवर संशय, मतदानाचा झाला खेळखंडोबा

Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकांत गोंधळ; शाई पुसली, ईव्हीएमवर संशय, मतदानाचा झाला खेळखंडोबा

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या असून, संपूर्ण निवडणूक यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या असून, संपूर्ण निवडणूक यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तब्बल ७ ते ८ वर्षांनंतर होणाऱ्या या महत्त्वाच्या निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मतदार, उमेदवार तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त करण्यात आला आहे.

बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप

मतदान केल्यानंतर ओळख म्हणून लावली जाणारी बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी मुंबईसह राज्यातील जवळपास सर्वच महापालिका क्षेत्रांतून समोर आल्या. यंदा निवडणूक आयोगाने पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला. मात्र हा मार्कर काही वेळातच पुसला जात असल्याचे अनेक मतदारांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे दुबार मतदान आणि बोगस मतदान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “मतदारांचा अधिकार पुसण्याचे पातक निवडणूक आयोग करत आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. लोकशाही पद्धतीने मतदान होत आहे की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ईव्हीएम बिघाड, बटण न दाबल्याच्या तक्रारी

मुंबईतील धारावी येथील प्रभाग क्रमांक १८४ मध्ये मशाल चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याची तक्रार मतदारांनी केली. चेंबूर आणि मानखुर्द परिसरातही काही चिन्हांवरील बटणे काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा गंभीर आरोप केला. “कमळाचे बटण दाबले जाते, मात्र इतर बटणे काम करत नाहीत,” असे म्हणत त्यांनी लोकशाहीला वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला.

ईव्हीएम क्रमानुसार नसल्याचा गोंधळ

मुंबई वगळता उर्वरित २८ महापालिकांमध्ये प्रभाग रचनेनुसार अ, ब, क, ड अशा वॉर्डमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. अशा ठिकाणी ईव्हीएम मशिन्सही त्याच क्रमाने लावणे अपेक्षित असते. मात्र पुण्यासह अनेक ठिकाणी हा क्रम पाळला गेला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. यामुळे अनेक मतदारांचे मतदान अवैध ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

व्हीव्हीपॅटचा अभाव, पारदर्शकतेवर प्रश्न

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर महापालिका निवडणुकांत न केल्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आपण दिलेले मत योग्य उमेदवारालाच गेले का, याची खात्री व्हीव्हीपॅटमुळे मिळत होती. मात्र यावेळी त्याचा अभाव असल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

मतदान केंद्र व बूथ शोधण्यात अडचणी

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचेच मतदान केंद्र बदलण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. ही समस्या केवळ मंत्र्यांपुरती मर्यादित न राहता अनेक सामान्य मतदारांनाही भेडसावत होती. ऐनवेळी मतदान केंद्र किंवा बूथ बदलल्यामुळे विशेषतः मुंबईसारख्या महानगरात मतदारांची मोठी गैरसोय झाली.

निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात

बोटावरील शाई पुसली जाणे, ईव्हीएम बिघाड, व्हीव्हीपॅटचा अभाव, दुबार मतदार, मतदान केंद्र न सापडणे अशा विविध तक्रारींमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरांतून टीका होत असून, लोकशाहीच्या विश्वासार्हतेवरच आघात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com