Chat GPT Down: चॅटजीपीटी सेवा ठप्प, वापरकर्त्यांना अडचणी
ओपनएआयच्या चॅटबॉट चॅटजीपीटीचा वापर करताना भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वापरकर्त्यांनी चॅटजीपीटी वेबसाईटवर सेवा विस्कळीत झाल्याचा अनुभव घेतल्याची तक्रार केली आहे.
वापरकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म वापरताना ‘एरर 503: सेवा काही काळासाठी उपलब्ध नाही’ असा संदेश दिसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे जीपीटी-4 आणि त्याचा छोटा प्रकार जीपीटी-4 मिनी या दोन्ही सेवा बंद झाल्या आहेत.
जगभरातील वेबसाईट्सवर आलेल्या बिघाडांवर नजर ठेवणाऱ्या डाऊन डिटेक्टर या प्लॅटफॉर्मनेही चॅटजीपीटीच्या समस्येबाबत नोंद घेतली असून, 1000 पेक्षा अधिक वापरकर्त्यांनी सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली आहे.
ओपनएआयच्या अधिकृत स्टेटस पेजवरही चॅटजीपीटी आणि एपीआय सेवांमध्ये अडचणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या सेवा ठप्प होण्यामागची नेमकी कारणे शोधली जात असून, ओपनएआयकडून तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
डिसेंबरपासून तिसऱ्यांदा चॅटजीपीटी सेवा विस्कळीत
डिसेंबरपासून चॅटजीपीटी सेवा ठप्प होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीही, एकाच महिन्यात दोनदा सेवा ठप्प झाल्याचे दिसून आले होते. या बिघाडामुळे अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या कामांमध्ये अडथळा आल्याची भावना व्यक्त करताना दिसत आहे. काहींनी सोशल मीडियावर आपल्या अडचणी मांडल्या आहेत, तर काहींनी या प्रसंगावर मीम्स तयार करत हलक्याफुलक्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. ओपनएआयने सेवा लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असून, वापरकर्त्यांना काही काळ संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.