Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं
छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सिडकोकडून टीव्ही सेंटरच्या दिशेने जाणारी ही कार सर्व्हिस रोडने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने काळा गणपती मंदिर परिसरात उभ्या असलेल्या 4 ते 5 पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत काही नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातग्रस्त कार आणि चालकाबाबत तपास सुरू केला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, भरधाव वेग आणि निष्काळजी वाहन चालवणे हे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती घेतली जात आहे.