Chhatrapati Sambhajinagar : शालेय पोषण आहारात नव्या मेनूची सुरुवात; विद्यार्थ्यांना मिळणार चविष्ट आहार
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना अधिक चविष्ट व पौष्टिक आहार दिला जाणार आहे. शिक्षण विभागाने जुने तीन मेनू रद्द करून त्यांच्या जागी सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव आणि मूग शेवगा वरण-भात हे तीन नवीन मेनू समाविष्ट केले आहेत. या सुधारित योजनेची अंमलबजावणी येत्या चार दिवसांत सुरू होणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 65 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.
राज्य शासनाच्या 2003 पासून सुरू असलेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषणयुक्त जेवण पुरवले जाते. या योजनेत आधी तूरडाळ खिचडी, नाचणं सत्व व उसळ-भात असे पारंपरिक मेनू होते. मात्र शिक्षण विभागाने अलीकडेच त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस केली होती. शासनाने ती मान्य करून विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण 3 हजार 165 जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळा आहेत. या सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज बदलते मेनू दिले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पोषणच नव्हे तर जेवणात विविधताही मिळणार आहे.
दोन आठवड्यांच्या फेरविन्यासित मेनूमध्ये सोमवारी व्हेज पुलाव किंवा सोयाबीन पुलाव, मंगळवारी मसाले भात किंवा मसुरी पुलाव, बुधवारी मटार पुलाव किंवा मूग-शेवगा वरण-भात, गुरुवारी मूगडाळ खिचडी किंवा मोड आलेली मटकी उसळ, शुक्रवारी चवळी खिचडी किंवा अंडा पुलाव, तर शनिवारी चणा पुलाव किंवा गोड खिचडी अशी चविष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शालेय पोषण आहारातून मुलांच्या पोषणतत्वांची गरज पूर्ण होऊन त्यांच्या शारीरिक विकासाला हातभार लागेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, चव आणि आरोग्य यांचा समतोल राखत विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.