मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. शिवसेनेचं पक्षचिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अजून निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तर सुप्रीम कोर्टामध्येही सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. शिंदे सरकारमधील २० मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे नवनवे मुहुर्त सातत्याने समोर आल्यानंतही ते हुकले आहेत. त्यामुळे आता मोदी मुंबई दौरा आणि आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण विधिमंडळात करण्यात आले. यावरूनही राज्यात राजकीय नाट्य घडलं. आता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने तेथे काय चर्चा होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.