Devendra Fadnavis : मुंबईच्या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार झंझावात

Devendra Fadnavis : मुंबईच्या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार झंझावात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रचारासाठी आक्रमक रणनिती आखली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रचारासाठी आक्रमक रणनिती आखली आहे. उद्यापासून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार असून, येत्या काही दिवसांत मुंबईत ६ पेक्षा अधिक जाहीर सभा, अनेक ठिकाणी रोड शो, तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील निवडणूक प्रचाराला वेगळीच धार मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारात केवळ सभा आणि रॅलीपुरते मर्यादित न राहता, टॉक शो, जाहीर मुलाखती आणि मान्यवरांच्या भेटीगाठींवरही विशेष भर दिला जाणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर थेट संवाद साधत मुंबईकरांसमोर सरकारचे व्हिजन मांडण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जाहीर मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईच्या विकासाचा आराखडा, पायाभूत सुविधा, वाहतूक, घरबांधणी, पर्यावरण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दरम्यान, आज वरळीतील NSCI डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील प्रचारादरम्यान ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर सातत्याने आरोप आणि टीका केली जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी सभांमध्ये मुख्यमंत्री या आरोपांना प्रत्युत्तर देत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची भूमिका मांडतील, अशी चर्चा आहे. एकूणच, मुंबईच्या महासंग्रामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार झंझावात महायुतीसाठी निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय चित्र अधिकच स्पष्ट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com