Uddhav Thackeray : “अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री” उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
थोडक्यात
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री” म्हटले.
Uddhav Thackeray On Devendra Fandvis : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “अॅक्सीडेंटल मुख्यमंत्री” म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप ही “भ्रष्टाचारी जनता पार्टी” आहे आणि सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत आहे. “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दाखवण्यासाठीच माझा हा दौरा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “सातबारा कोरा करण्याची हीच वेळ आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. केंद्रीय पथक कधी आले आणि गेले हेच जनतेला कळले नाही.” दरम्यान, ठाकरे यांनी फडणवीसांविषयी बोलताना दावा केला की, “फडणवीस हे अॅक्सीडेंटल सीएम आहेत; अन्यथा मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंनाच दिले गेले असते.”
पार्थ पवार प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप केला. “मुरलीधर मोहोळ यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यात आलं, पण अंबादास दानवे यांनी अनेक घोटाळे उघड केले आहेत,” असं ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

