Devendra Fadanvis : पूरग्रस्त परिस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून बळीराजाला धीर! पाहणीपूर्वीच मदतीचा हात
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती आणि जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या काळात कधीही शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई दिली नाही. मात्र हे सरकार पाहणीपूर्वीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2200 कोटी रुपयांचा निधी रिलीज करणारे पहिले सरकार आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला. “शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल ते आम्ही करत आहोत आणि पुढेही करू,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असून तब्बल 23 लाख 414 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे हा आकडा 25 लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 1239 गावे बाधित झाली असून 2 लाख 61 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. जिरायत पिकांसह बागायती व फळपीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसला असून सहा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात दोन, धाराशिव जिल्ह्यात तीन, बीडमध्ये तीन तर नांदेडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी चार जणांचा अद्याप शोध सुरू आहे. याशिवाय 337 जनावरे दगावली आहेत. फक्त धाराशिव जिल्ह्यातच 200 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

