Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा, वारकरी संप्रदायात उत्साह
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची शासकीय पूजा 6 जुलै 2025 रोजी सप्तनिक होणार आहे. त्यांनी याआधी 2015 साली 27 जुलै रोजी पहिल्यांदा शासकीय पूजा केली होती, तसेच 2019 मध्ये देखील त्यांनी विठूरायाची पूजा केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकरी संप्रदायामध्ये मोठा उत्साह आहे. राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या पूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील एका वारकरी दांपत्यालाही पूजेसाठी मान दिला जातो.
दरम्यान, आज आणि उद्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान सोहळे पार पडत आहेत. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने भव्य आणि जय्यत तयारी केली आहे. मार्गातील सुविधा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, वारीतील शिस्त आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविकांचा ओघ पंढरपूरकडे सुरु असून, ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष आकाशात घुमत आहे. राज्य शासन वारकरी परंपरेला अभिमानाने पुढे नेत असून, मुख्यमंत्री स्वतः या परंपरेत सहभागी होत भाविकांना प्रेरणा देत आहेत.